10/03/2024
सावित्री बाईंची स्त्री-मुक्ती
8 मार्च जागतिक महिला दिन आणि 10 मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. सावित्रीबाई भारतातील पहिल्या थोर थोर क्रांतिकारक स्त्री. भारतीय स्त्री शिक्षणाच्या आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे.
महाराष्ट्रात 3 जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पण जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई यांची पुण्यतिथी यांच्यातील जवळीकही मला विलक्षण वाटते.
दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा सावित्रीबाईंच्या संघर्षाचा काळ पडद्याआड गेला असला तरी स्त्री शिक्षणाच्या समस्या आजही संपलेल्या दिसत नाहीत. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व जगभर स्त्री शिक्षण आणि स्त्री दमन यावर विचारमंथन होत असताना मला सावित्रीबाईंना अभिप्रेत असलेली स्त्री-मुक्ती काय होती हे पाहणे गरजेचे वाटते.
1848 साली सावित्री बाईंनी अध्यापिका म्हणून भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेत पाऊल टाकले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली... आणि म्हणूनच आज आपण आपल्या हक्कासाठी जागृत होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. त्यामागे वयाच्या अठरा-एकोणीस वर्षाच्या सावित्रीने शेणा मातीचे गोळे तर झेललेच, त्याचबरोबर प्रचंड मानहानी आणि अवहेलना सहन केली प्रसंगी तिला गृहत्यागही करावा लागला.
स्त्री शिकली की तिचे पाऊल वाकडे पडते. ती दुराचारी होते. तिने लिहिलेल्या अक्षरांच्या आळ्या होऊन तिच्या पतीच्या पानात पडतात, असल्या बुरसटलेल्या विचारांच्या- अंधश्रद्धेच्या जोखडातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी ते आपल्या पतीसोबत घराबाहेर पडली.
पती सोबतचा हा गृहत्याग केवळ मम म्हणून किंवा ती ती पतिव्रता होती म्हणून नव्हता. तिला पक्के ठाऊक होते की पुरुषी दास्यत्वातून स्त्रीला मुक्त करण्यासाठी आपण जो शिक्षणाचा वसा हाती घेतला आहे तो ही शाळा बंद पडली तर सोडून द्यावा लागेल. म्हणून तिने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तिचा पतिव्रता धर्म, तिचं सहधर्मचारिणी पद अत्यंत डोळस होतं.
स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत. आणि संसाराचा भार वाहण्याकरिता ही ही दोन्ही चाके सक्षम समान योग्यतेची असणे गरजेचे आहे त्यासाठीच स्त्री सक्षमीकरण महत्त्वाचे आहे हाच स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ सावित्रीबाई मानत होत्या.
स्त्री ही पारिवारिक बंधनात अडकलेली आहे त्यामुळे तिला सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्रात विकास करण्याकरिता आवश्यक असे स्वातंत्र्य मिळत नाही ही त्यांची व्यथा होती.
अनादी काळापासून भारतात पितृसत्ताक पद्धती रूढ असल्याने मनु प्रणित विचारसरणीने तर तिच्यावर दास्यत्वाचा शिक्कामोर्तबच केला होता. स्त्रियांना वेद पठणाचा अधिकार नाही. मला शिक्षणाची गरज काय? नवरा जिवंत असताना तो तिला द्यूतात पणाला सुद्धा लावू शकतो. आणि हाच नवरा मेला तर सती जाण्याचं पवित्र धार्मिक कार्यही तिनेच करावे अन्यथा मुंडन करून विद्रुप होऊन जीवन जगावे. पुरुषी वासनेला बळी पडावे. अशा पाशवी बंधनातून स्त्रीमुक्ती हवी असे ठाम मत सावित्रीबाईंनी व्यक्त केले होते.
स्त्री मुक्त असावी म्हणजे स्वैर असावी असे नव्हे तर स्त्री मुक्त असावी म्हणजे शिक्षणाच्या संस्काराने संस्कारित होऊन कणखर आत्मनिर्भर व्हावी असाच स्त्री मुक्तीचा अर्थ सावित्रीबाईंना अभिप्रेत होता.
त्या आपल्या कवितेत म्हणतात…
अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला
युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊन चला चला
न कुरकुरता नआळसता शाळेत जाऊ शिकू चला
गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला चला!
सावित्रीबाईंनी त्यांच्या काळातील स्त्री जीवनाचा सखोल अभ्यास केला होता. स्त्रिया वर होणारे पाशवी अत्याचार त्यांना अंतर्मुख करून स्त्रियांच्या उद्धाराकरिता काहीतरी केले पाहिजे ही प्रेरणा देऊन गेले.
बाईंनी स्त्रीमुक्ती बाबतचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले त्याकरिता त्यांनी त्या काळात केलेले पुढील प्रयत्न उल्लेखनीय आणि धाडसी होते.
* बाल हत्या प्रतिबंधक गृह :- ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंच्या सक्रिय सहभागाने चालविलेले बाल हत्या प्रतिबंधक गृह म्हणजे समाज रोषाचे कारण होते.' अत्याचाराने कोणी विधवा गरोदर राहिली तर तिने गुपचूप येऊन बाळंत होऊन जावे ' अशी संकल्पना असलेले हे बाल हत्या प्रतिबंधक गृह समाजातील अन्यायी आणि जुलमी प्रथांचे द्योतक होते. पहिल्या चार वर्षातच अंदाजे 100 विधवांचे बाळंतपण येथे झाले होते.
* अनाथ बालिकाश्रम :- विधवांच्या गुप्त बाळांत पणामुळे जन्माला आलेल्या अनाथ बालकांसाठी सावित्रीबाईंनी बालिकाश्रम चालवला आणि त्या सर्व बालकांची सुश्रुषा स्वतः जातीने केली.
* स्त्री संघटना कार्याची स्थापना :- स्त्री शिक्षणा बाबत पुढाकार घेतलेल्या सावित्रीबाईंनी शूद्र अतिशूद्र भगिनींचे सामुदायिक हळदी कुंकू कार्यक्रम, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण, कुमारी माता, परितक्त्या, विधवा विवाह, बाल हत्या प्रतिबंध, बाल जरठ विवाह रोखणे, अस्पृश्यता निवारण या सर्व प्रश्नांवर स्त्रियांना बोलतं करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्त्री संघटना तयार केल्या. त्यामुळेच त्यांना स्त्रीमुक्ती आंदोलनाची गंगोत्री असे म्हणले जाते.
* विधवा विवाह व न्हाव्याचा संप :- सावित्रीबाई फुले यांच्या काळात बाल जरठ विवाह सर्रास रूढ होता त्यामुळे अल्पवयातच पतीचा मृत्यू झाल्याने बाल विधवांचे प्रमाण जास्त होते या विधवांचे जिने नरकमय होते. तिचे केशवपन करून तिला विद्रूप करून सामाजिक धार्मिक कार्यापासून वंचित केले जात असे. या प्रति विरोधात स्त्रियांना संघटित करून त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. ज्योतिबांना हाताशी धरून न्हाव्यांचा संप घडवून आणला. विधवा विवाह चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला.
* स्त्रीमुक्तीसाठी लेखन आणि व्याख्याने :- गृहीणी नावाच्या मासिकात सावित्रीबाई गृहिणी या टोपण नावाने लिखाण करत असत. लेखाचे विषय म्हणजे - जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्व, विधवा विवाह चे महत्व पटवून देणे, बालविवाहाचे दुष्परिणाम इत्यादी असत. त्या वेळोवेळी या विषयांसाठी व्याख्यानेही देत असत. सावित्रीबाईंचे हे लेखन आज उपलब्ध नसले तरी स्त्रीमुक्ती आंदोलनाचे त्यांचे कार्य अधोरेखित करणारे असेच आहे.
हीच स्त्री चा खरा उद्धार करू शकते असे मानले जात असले तरी, पुरुषांच्या सहकार्याशिवाय हे कार्य अशक्य आहे हे त्या ओळखून होत्या, त्या म्हणत असत की, माझ्या पती सारखे काही स्त्री जातीचे कनवाळू पुरुष स्त्रियांना त्यांचे हक्क देण्यास निश्चितच पुढे येतील याची मला खात्री आहे.
बनणे स्वतःच्या पत्नीला शिकवून तिला स्त्री मुक्ती करता शिक्षण घेऊन तिची मनोभूमिका तयार करण्याचे काम केले हे खरे आहे. परंतु पतीच्या ध्येयाला आयुष्यभर साथ देत सत्य समता आणि मानवता यासाठी प्रखर छळाला आणि विरोधाला टक्कर देऊन लढा देणारी कर्तुत्ववान स्त्री होती सावित्रीबाई. सावित्रीबाईंनी त्यांच्या काळातील स्त्रियांच्या समस्या लक्षात घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्त्री शिक्षणाचा महत्वपूर्ण पाया उभा केला म्हणूनच आज स्त्रीमुक्ती आंदोलनाला सर्वंकष स्वरूप आले आहे असे मला मनोमन वाटते. सावित्रीबाईंना त्रिवार मुजरा!!
Avishkaar Educational Services