30/04/2026
📚"स्पर्श अवलियाचा"
✍️लेखक - सुहास देसाई
सुहास देसाई काकांनी सद्गुरू श्री शंकर महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची सर्वच पुस्तकं ही अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनुभवात्मक असतात. भरपूर भ्रमंती, अभ्यास व अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने प्रत्येक वेळी त्यांचे नवीन पुस्तक वाचायला घेतले की दरवेळी नवीन आणि यापूर्वी कधीही न ऐकलेली किंवा वाचलेली माहिती आपणास मिळते. अगाध ज्ञानाचा भांडार काकांनी त्यांच्या पुस्तकांतून खुला करून दिलेला आहे. खरा परमार्थ म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी तसेच दीन दुबळ्या व गरजू लोकांचा उध्दार करण्यास्तव सद्गुरू श्री शंकर महाराजांचा संचार सर्वत्र असे. विविध प्रसंगी अनेक चमत्कार व लिला महाराजांनी केलेल्या आहेत. परंतु हे सर्व लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठीच महाराजांनी केले होते हे या पुस्तकांतील प्रसंग व अनुभवांतून दिसून येते.
या पुस्तकात लेखकांनी पाथर्डीचे माधवनाथ बाबा, त्र्यंबकेश्वरचे रामभाऊ अकोलकर, बाबुराव रूद्र, जनार्दन बुवा, ढेकणे मामा, भालचंद्र देव, ज्ञाननाथजी रानडे, जुबेदाबेन इनामदार तसेच इतर अनेक भक्त व पट्टशिष्यांची माहिती दिलेली आहे. आत्तापर्यंत अनेक पुस्तके वाचताना महाराजांच्या या सर्व शिष्यांबद्दल एवढी खोलवर माहिती अन्य कुठेही मिळालेली नव्हती. तसेच सोलापूर येथील भक्त मंडळींसोबतचे महाराजांचे प्रसंग व अनुभव, महाराजांनी केलेले महत्त्वाचे तीन यज्ञ आणि विशेष म्हणजे त्यांचे 13 या शुभांकाचे यथार्थ विश्लेषण ही सर्व महत्त्वाची माहिती सुहास देसाई काकांनी या पुस्तकात दिलेली आहे.
पाथर्डीचे माधवनाथ बाबा हे सध्या हयात असून त्यांचे अनुभव लेखकांनी सुंदररित्या वर्णिलेले आहेत. तसेच महाराजांचे काही जबरदस्त अनाकलनीय व आश्चर्यकारक प्रसंग या पुस्तकात वाचावयास मिळाले. महाराजांच्या भक्तांचे अनुभव, त्यांच्या जवळच्या भक्तांची दुर्मिळ माहिती, महाराजांचा उपदेश व शिकवण या सर्वांची सांगड लेखकांनी फारच सुरेख पद्धतीने या पुस्तकात घातलेली आहे. या सर्व माहितीच्या लाभाने महाराजांबद्दल श्रध्दा,भक्ती व निष्ठा नक्कीच वाढीस लागणार हे निश्चित!
नक्कीच वाचा!
जय शंकर!
- मनोज मंडले.
🔶🔶🔶🔶
मुल्य: रु.100/-
पुस्तकासाठी संपर्क:
श्री कृपा बुक स्टॉल,
📲9822303660