02/12/2021
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विषयी खोटी माहिती प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा भाजपचा अत्यंत हीन दर्जाचा केविलवाणा प्रयत्न.
केंद्र सरकारच्या अधिवेशनावेळी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून हिटलरशाहीच्या वृत्तीने देशातील १२ खासदार निलंबित केले गेले. त्यात शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश होता. निलंबन केल्यानंतर सर्व खासदारांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
निलंबित खासदारांनी माफी मागावी अशी मागणी समोर आल्यानंतर माकपच्या कुठल्यातरी खासदाराने "माफी मागायला मी काय सावरकर आहे का ?" असं वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा शिवसेना किंवा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.
परंतु शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कुठलाही मुद्दा सापडत नसल्याने माकपच्या त्या खासदाराचं वक्तव्य शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं असा अपप्रचार भाजपचे महाराष्ट्रातील नेते अतुल भातखळकर, चित्रा वाघ, आशिष शेलार आणि दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शिवसेनेचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं प्रेम जगजाहीर आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्टफिकेटची गरज नाही. गेली ७ वर्ष झाले केंद्रात एकहाती सत्ता असुनही भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. त्यासाठी शिवसेना खासदारांनी गेल्या ७ वर्षात ४ वेळा संसदेत मागणी देखील केली आहे. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व आणि भाजपचं बेगडी हिंदुत्व यात जमीन आस्मानचा फरक आहे.
फक्त आणि फक्त राजकीय फायद्यापोटीच भारतीय जनता पक्षाला सावरकर आठवतात हेच खरं आहे. सावरकरांना त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त विरोध संघाच्या विचारसरणीच्या व्यकतींनीच केला हे कितीही अमान्य केलं तरी सत्य आहे. फक्त आजपर्यंत हे बोललं जात नव्हतं. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशात बदनामीच गेल्या ७ वर्षात चालू झाली. कॉंग्रेस मधल्या गांधी, नेहरू यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करून त्यांची तुलना करण्यासाठी महान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर केला आणि तिथूनच भाजप विरोधक सावरकरांचे माफीनामे, त्यांच्या चुका याविषयी बोलू लागले. जे खुप क्लेशदायक आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवते हे भाजपने विसरू नये.
प्रियंका चतुर्वेदी यांची बदनामी करण्यासाठी भाजपने केलेलं हे गलिच्छ राजकारण सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणार आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे. शेलारांमध्ये किंवा भाजपच्या नेत्यांमध्ये थोडीजरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी माफी मागायलाच हवी.
✍️ - अक्षय काळे, शिवसैनिक !!
Priyanka Chaturvedi Sanjay Raut ShivSena