12/11/2025
प्रा. कृष्णकुमार गावंड लिखित "साक्षीदार सुवर्णयुगाचे" पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले लेखक प्रा. कृष्णकुमार गावंड यांच्या मनोरंजन क्षेत्राच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात (५० वे वर्ष) त्यांच्या संपर्कात आलेल्या मनोरंजन क्षेत्रातील सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे "साक्षीदार सुवर्णयुगाचे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. १६ नोव्हेंबर, २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता साळगावकर सभागृह (यशवंत नाट्यगृह), माटुंगा येथे नुकतीच शंभरी पूर्ण करणाऱ्या हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या पद्माताई दिवाणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. याप्रसंगी अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर, पार्श्वगायिका डॉक्टर अपर्णा मयेकर, विजय पाध्ये, डॉ. विकास सांडू, विवेक मेहत्रे, शिवाजी धुरी यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत. उदवेली बुक्स प्रकाशित या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील करणार आहेत.
रोटी, कपडा, मकान या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी कला, साहित्य आणि संस्कृति या त्रयीने मनुष्याच्या जीवनात एक विरंगुळा निर्माण केला आहे. हा विरंगुळा निर्माण करण्याचे पवित्र काम अनेक दिग्गजांनी केले आहे. अशा या दिग्गजांचे ऋण फेडणे कठीण आहे. परंतु त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेऊन त्यांना गौरविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्रा. कृष्णकुमार गावंड यांनी या पुस्तकात केला आहे. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी निर्मिलेल्या या चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच गायक, गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार होईल. तसेच मराठमोळ्या संगीताला आकार देणाऱ्या भावगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत या दालनामध्येही मोकळ्या मनाने भ्रमंती कराल. यामध्ये हिमालयाची उंची गाठलेले अनेक कलाकार वाचकांना अनुभवता येतील तर दुर्दैवाने प्रसिद्धीस मुकलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्वावर टाकलेला प्रकाशझोत डोळे दिपवून टाकेल. मनोरंजनक्षेत्राच्या सुवर्णकाळातील अशा अनेक साक्षीदाराच्या योगदानाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न प्रा. कृष्णकुमार गावंड यांनी या पुस्तकातून केला आहे.