29/07/2025
📚📚 पुस्तक परिचयमाला : पुस्तक १
📚 पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : साताऱ्याच्या भूमीतील विचार व कार्य
📚 लेखक : बाळासाहेब कांबळे
📚 प्रकाशक : द युनिक फाउंडेशन,पुणे
📚 परिचयकर्ता : विवेक घोटाळे ( नागदे )
—–
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, " जो इतिहास जाणत नाही, तो इतिहास निर्माण करू शकत नाही." लेखक-कवी बाळासाहेब कांबळे यांनी जुन्या सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकून जुना इतिहास नव्याने समोर आणण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. ‘भिनवाडा' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणि प्रयोगशील-सर्जनशील शिक्षक बाळासाहेब कांबळे यांचे प्रस्तुत पुस्तक जुन्या सातारा जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहवासातील व्यक्तींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करते. देशातील किंवा महाराष्ट्रातील कोणतेही ठिकाण असो, ज्या ठिकाणी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केले किंवा भेटी दिल्या, अशी ठिकाणे केवळ ऐतिहासिक ठरत नाहीत तर ती ठिकाणे, तेथील वास्तव्य, तेथील सभा, सहवासातील व्यक्ती ह्या नव्या पिढीच्या विचारांची व कार्याची प्रेरणाच ठरतात. बालभिवाचा छ. प्रतापसिंह हायस्कूलमधील प्रवेश, त्यांना लहान वयात आलेले अस्पृश्यतेचे अनुभव, त्यांना मिळालेले 'आंबेडकर ' हे आडनाव, त्यांचे आई-वडिल इत्यादी संदर्भात लेखकाने चांगल्या प्रकारे मांडणी केली आहे.
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुभेदार रामजी आपल्या कुटुंबासह १८९६ साली सातारा जिल्ह्यात आले.खटाव तालुक्यातील गोरेगावला ते दुष्काळी कामावर कोशपाल म्हणून नोकरी करत होते.बाल भीमासह कुटुंब सातार्यात होते.
बाबासाहेबांना लहान वयात सैन्याच्या छावणीत अस्पृश्यतेचे अनुभव आले नाहीत पण शाळेत अस्पृश्यतेला सामोरे जावे लागले.सातारा हायस्कूलमध्ये बाल भिवा वर्गमिञांमध्ये गुणवत्तेनुरूप बसू शकत नव्हते.त्यांना एका कोपर्यात एकटे बसावे लागत होते.ते नळाला स्पर्श करू शकत नव्हते,कोण्या स्पृश्य माणसाने नळ भिवासाठी उघडला तरच पाणी पिता येत असे. छ.प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बाल भिवांनी १९०० ते १९०४ पर्यत इंग्रजी माध्यमातून चौथीपर्यतचे शिक्षण घेतले.आजही त्या शाळेत तेव्हाचे रजिस्टर उपलब्ध आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या सहवासातील काही व्यक्तींचे कार्य आणि प्रत्यक्ष सहवास लाभला नसला तरी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या व कार्याच्या प्रभावातून कार्य करणाऱ्या काही व्यक्तिमत्त्वांवरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. यातील काही व्यक्ती महाराष्ट्राला परिचित असल्या तरी काही व्यक्ती सातारा जिल्ह्याबाहेर माहिती नव्हत्या. या पुस्तकाच्या निमित्ताने या व्यक्ती राज्याला माहिती होणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील,चरिञकार चांगदेव खैरमोडे,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,डॉ.शंकरराव खरात,बंधू माधव,राजा ढाले,शांताबाई कांबळे,ज्योतीबा झोडगे,द्वारकाबाई खैरमोडे,शिवराम तीरमारे ( दुधोंडी ), पाली भाषा अभ्यासक बाबा भारती,आर.डी.भंडारे,बेबीताई कांबळे,शंकरराव फणसे इत्यादींची माहिती लेखक करून देतात.याशिवाय जुन्या सातारा जिल्ह्यातील बहिष्कृत भारतमधील नोंदी लेखकांनी एकञित केल्या आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे लेख,पञाचा संग्रह,त्याकाळातील सभा व परिषदांतील भाषणाचे संकलन लेखकांनी पुस्तकात केले आहे.
लेखकाचे गाव मायणी आणि मायणीत डॉ.बाबासाहेब आल्याने लेखक प्रेरित आहेत.प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन आज कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी ( सातारा ) येथे होत आहे. संस्थेच्या वतीने लेखकाचे अभिनंदन करून आम्ही त्यांचे आभार मानतो.
---------
समीक्षक प्रा.रणधीर शिंदे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
" बाळासाहेब कांबळे यांनी या छोटेखानी ग्रंथात सातारा जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणीचा वास्तव्यकाळ, पुढे आंबेडकरांचा या जिल्ह्याशी आलेला संबंध आणि आंबेडकरी चळवळीला या जिल्ह्यात मिळालेल्या प्रतिसादाचे चित्रण केले आहे. तसेच या अभ्यासात सातारा जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरी विचारधारा परंपरेचा धांडोळा घेण्यात आला आहे. 1925 नंतरच्या काळातील महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीची दिशा, सामाजिक हस्तक्षेपाची जाणीव, राजकीय निवडणुकांमधील सहभाग व आंबेडकरांची विचारभूमिका हे घटक जाणून घेण्यासाठी असे लेखन महत्त्वाचे ठरते. तसेच या लेखनात चळवळी, समाज यातील अंतर्गत संघर्ष व टकरावाच्या नोंदी देखील आहेत. एखाद्या महापुरुषांच्या कर्तृत्वाची सावली एखाद्या भौगोलिक प्रदेशावर कशी पडते, त्याचा प्रभाव आणि परिणाम समजून घेण्यास असे ग्रंथ महत्त्वाचे ठरतात. तसेच त्या-त्या प्रदेशाचा पूर्वजवारसा, अभिमान जाणून घेण्यासाठी अशी अभ्यासदिशा महत्त्वाची ठरते. याशिवाय गतइतिहासातील सामाजिक संदर्भांची पाहणीदेखील तितकीच महत्त्वाची ठरते."
----------------
जुन्या सातारा जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास, डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन व्यक्ती आणि विचार जाणून व समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवश्यक वाचावे.कोणत्याही चळवळीचा स्मृतिइतिहास हा नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो.जुना सातारा जिल्हा आणि डॉ.बाबासाहेबांचा , चळवळीतील व्यक्तींचा इतिहास सूञबध्द पध्दतीने व ओघवत्या भाषेत लेखकांनी मांडल्याने तो नवीन पिढीला उपयुक्त ठरणार आहे.
📚 डॉ.विवेक घोटाळे,द युनिक फाउंडेशन,पुणे.
#हरिती_वाचन_चळवळ #पुस्तक