Book Roof Online Book Store

Book Roof Online Book Store Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Book Roof Online Book Store, Book shop, Pune.

१) ओडिसी- संजय सोनवणी:  ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- ग्रीक पुराणकथा, कादंबरी, ग्रीक महानाट्य )( काळ बदलतो माणसे बदलतात . पण...
08/09/2026

१) ओडिसी- संजय सोनवणी: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- ग्रीक पुराणकथा, कादंबरी, ग्रीक महानाट्य )

( काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा. )
०००

२) भाऊ पाध्ये यांची कथा- राजन गवस-( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- आस्वाद, परिचय, समीक्षा, माहितीपूर्ण, कथाविषयक )

( नवकथाकारांनी मराठी कथेला आधुनिकतेशी जोडले. तिच्या जाणीव-नेणिवांचे सूक्ष्म दर्शन घडवून तिच्यातील विकृती समोर आणली. परंतु या विकृतीशी समंजस होण्याची महत्त्वाची दृष्टी आपल्याला भाऊ पाध्येंची कथा देते. तसेच निव्वळ समंजसपणापर्यंत मर्यादित न राहता पाध्येंची कथा आपल्याला आधुनिक ताणांखाली दबलेल्या नैसर्गिक प्रेरणांबद्दल अधिकाधिक सजग व अंतर्मुख करत जाते.
प्रस्तुत पुस्तकामध्ये या समंजस प्रवृत्तीचा चिकित्सक आविष्कार आढळतो. विविध जीवनस्तरांतून निर्माण होणाऱ्या नैतिक पेचांच्या धरतीवर विस्तारित होत जाण्याची प्रक्रिया या पुस्तकामुळे अपरिहार्य ठरते.. )
०००

३)ऑस्कर वाईल्डच्या कथा- जनार्दन ओक: ( उत्तम स्तिथीतले पुस्तक, प्रकार- अभिजात कथासाहित्य, अद्‌भुतरम्य कथा, अनुवादित संग्रह )

( ऑस्कर वाईल्डच्या प्रमुख कथा आणि वैशिष्ट्ये:
दांभिकांच्या जीवनातलं वास्तव ह्या संग्रहातल्या कथा सांगतात. स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍र्यांच्या जीवनातले वास्तवाचे कंगोरे अधोरेखित करतात आणि बरंच काही शिकवूनही जातात. जागतिक स्तरावरच्या ह्या दर्जेदार कथांचा तेवढाच दर्जेदार अनुवाद करण्यात वसंत गुप्ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळं त्या वाचकांना निश्चितपणे आवडतील अशा झाल्या आहेत.
१) द सेल्फिश जायंट (The Selfish Giant): एका स्वार्थी राक्षसाची कथा जो मुलांना आपल्या बागेत खेळण्यापासून रोखतो, ज्यामुळे बागेत कायमचा हिवाळा येतो. नंतर त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते
२) द हॅपी प्रिन्स (The Happy Prince): एक सोन्याचा पुतळा आणि एका लहान पक्षाची कथा, जे गरिबांना मदत करण्यासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करतात
३) द कॅन्टरविले घोस्ट (The Canterville Ghost): एक विनोदी आणि गूढ कथा, जिथे एक अमेरिकन कुटुंब एका जुन्या इंग्रजी हवेलीत भूत असतानाही निर्भयपणे राहते
४) द नाईटिंगेल अँड द रोझ (The Nightingale and the Rose): प्रेमासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या एका बुलबुल पक्ष्याची हृदयस्पर्शी कथा. )
०००

४) आपुलकी- म. द. हातकणंगलेकर: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- आस्वादक परिचय, समीक्षा, साहित्यविषयक, व्यक्तिदर्शन, व्यक्तिरेखा, स्मरणरंजन, आठवणी, माहितीपूर्ण )

( आस्वादक परिचय, समीक्षा आणि स्मरणरंजनाने समृद्ध असलेल्या या पुस्तकात हातकणंगलेकर यांचे विविध कालखंडातील लेख आणि भाषणं आहेत.
यात त्यांनी श्री. दा. पानवलकर यांच्या कथेबद्दल, डॉ. अशोक केळकर यांच्या समीक्षेविषयी, महावीर जोंधळे यांच्या कवितेविषयी, तसेच डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या कथेविषयी लिहिले आहे.
सुभाष भेंडे यांच्या आठवणी ते जागवतात, तसेच नवकथा आणि साहित्य व्यवहारातील जातीय वादाबद्दल आपली मतं मांडतात.
कलावंतांच्या जीवनाचे पैलू उलगडणारी हातकणंगलेकरांची लेखणी जी. एं.च्या बद्दल देखील तितकेच भरभरून बोलते. )
०००

५) नाटककार बेंडे व्यक्ती आणि वाङ्मय- प्रा. भास्कर कुलकर्णी: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- संक्षिप्त चरित्र, व्यक्ती दर्शन, नाट्य परीक्षण, तुलनात्मक अभ्यास, माहितीपूर्ण, आठवणी, किस्से )

( मराठवाड्याचे पहिले प्रतिभावंत नाटककार कै.श्रीपाद नृहसिंह बेंडे यांच्या जीवन -चरित्राचा आणि त्यांच्या नाट्य कारकीर्दचा परिचय . )
०००

६) कफन- प्रेमचंद्र- अनु. चंद्रकांत भोंजाळ: ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- अनुवादित कथा, अभिजात साहित्य, कथासंग्रह )

( 'कफन' ही महान हिंदी लेखक मुंशी प्रेमचंद यांनी लिहिलेली अत्यंत प्रसिद्ध आणि मर्मभेदी कथा आहे, जी १९३६ मध्ये लिहिलेली अखेरची व गाजलेली कथा होती.
जात नाही ती 'जात' असं म्हटलं जातं आणि ते खरंच ठरवणारी परिस्थिती आपण आजूबाजूला पाहतो आहोत. या जातीपातीच्या संकल्पनांचा फटका बसतो गरिबांना, वंचितांना, शोषितांना. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली तरी आपल्या देशात दलितांवर अत्याचार होतच आहेत. मराठवाड्यात मंदिरात प्रवेश केला म्हणून दलित तरुणाची गावातून धिंड काढणं, हरियाणात जिवंत जनावराचं कातडं सोलल्याच्या संशयावरून पाच दलितांची दगडांनी ठेचून हत्या करणं ही याचीच जळजळीत उदाहरणं आहेत.
या दलितांच्या, वंचितांच्या संवेदनांचं नेमकं चित्रण प्रेमचंद यांनी आपल्या अनेक कथांमधून केलं आहे. खरं तर प्रेमचंद लिहित होते तेव्हा दलित साहित्य ही संकल्पना अस्तित्वातही आली नव्हती; पण प्रेमचंदांनी ज्या संवेदनशीलतेनं दलितांचं जग, त्यातले ताणेबाणे यांचं दर्शन या कथांमधून घडवलं, ते पाहिलं की थक्क व्हायला होतं. आरक्षणाच्या मुद्यावरून आणि खैरलांजी प्रकरणावरुन देशभरात गदारोळ उठलेला असतानाच काळावर ठसा उमटवणाऱ्या या साहित्यिकाला दिलीपराज प्रकाशनातर्फे शब्दांजली वाहण्याची संधी आम्ही घेत आहोत.
आहे. वाचक या प्रयत्नाचं स्वागत करतील असा विश्वास. )
०००

७) रजई- इस्मत चुगताई- अनु. कविता महाजन: ( उत्तम स्थितीतील पुस्तक, प्रकार- अनुवादित कथा, अभिजात साहित्य, कथासंग्रह )

( मी बर्‍याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काहीच पर्वा केली नाही. मी `रजई’ लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली.
तेव्हापासून माझ्यावर अश्र्लील लेखिका असल्याचा ठसा मारला गेला. `रजई’च्या आधी आणि `रजई’च्या नंतर मी जे काही लिहिलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मी लैंगिक विषयांवर लिहिणारी अश्र्लील लेखिकाच ठरले. अगदी आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्या पिढीने मला सांगितलं की, मी `अश्र्लील लेखिका’ नसून `वास्तववादी लेखिका’ आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या जिवंतपणी मला समजून घेणारे जन्माला आले. मंटोला तर वेडं ठरवलं गेलं. प्रगतिशील लेखकांनीही त्याला साथ दिली नाही. प्रगतिशील लेखकांनी मला ना ठोकरलं, ना डोक्यावर घेतलं. मंटो धुळीत मिसळला, कारण पाकिस्तानात तो कंगाल होता. मी पुष्कळच चांगल्या आर्थिक स्थितीत होतो. चित्रपटांमधून आम्हांला बर्‍यापैकी कमाई होत होती आणि `साहित्यिक मृत्यू वा जीवन’ यांची पर्वा नव्हती.
-इस्मत चुगताई. )
०००

८) हंस अकेला- मेघना पेठे: ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- कथासंग्रह )

( तसं तर काल उत्कटपणे 'जगलेलं' सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं - - नवे अर्थ हाती घेऊन !
लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी!
स्वतंत्र!
माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपण सुध्दा आयुष्यातल्या वेगवेगळया टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की!
जितकी आपली 'उमजण्या'ची ताकद मोठी तितकं आपलं 'भंगणं' अधिक! 'उमजून' घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकाकीपणाची तीव्र संवेदना!
जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच ! )
०००

९) एक्स्ट्रा तिकीट- दिलीप ठाकूर: (दुर्मीळ पुस्तक, प्रकार- सिनेविषयक, ललित लेखन, सदर लेखन, व्यक्तीदर्शन, व्यक्तिचित्रे, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शन, आठवणी, किस्से )

( पडद्यापलिकडे व पडद्याभोवती माणसांचे त्यांच्या भावनांचे/ज्ञानाचे भले मोठे जग आहे (पडद्यामागचे जग म्हणजे लफडी, कुचाळक्या इतकेच नव्हे ! पण सिस्टीमला वाटते, नट लोक' फक्त लफडी करण्यासाठीच जन्माला येतात) त्याचा आपल्या कुवतीने व पद्धतीने शोध घेणे हाच माझा धर्म आहे.... 'सिनेमाच्या यशोगाथा'मध्ये तुमचे स्वागत आहे. ग्लॅमर, सेक्स, गॉसिप, पार्ट्या, महुरत, प्रमोशन, मिडिया हाईप यापलिकडेही जावून या सिनेमाचे "आपलं एक विश्व' आहे. त्यात तुम्हा 'प्रेक्षकांची भूमिका' खूप मोठी व मोलाची आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवूनच हे पुस्तक आहे. कोणत्याही कला-प्रकारात 'प्रेक्षकाची दाद' खूप महत्त्वाची असते. ती मिळते अथवा नाही. पण ही 'मिळकत' वा 'वजाबाकी' हा वाटतो तितका सोपा प्रकार नाही. तुमच्यातील 'प्रेक्षकाचा आदर' ठेवूनच हे पुस्तक आहे. 'सिनेमापेक्षा प्रेक्षक मोठा' हे जळजळीत सत्य सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तो चलो 'शो' शुरू हो रहा है.
- दिलीप ठाकूर. )
०००

१०) ऐतिहासिक दृष्टिकोनातून पर्यटन- प्रा.डॉ. विकास कदम/ प्रा.डॉ. बाळकृष्ण माळी: (दुर्मीळ पुस्तक, प्रकार- ऐतिहासिक, माहितीपर, पर्यटन, संदर्भ साधन, अभ्यासपूर्ण )

( "ऐतिहासिक दृष्टिकोनातून पर्यटन" हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आधुनिक काळात पर्यटन हा एक महत्त्वाचा उदयोगधंदा म्हणून जागतिक स्तरावर त्याला महत्त्व मिळत आहे. पर्यटन या उदयोगासी त्याच्या देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती निगडीत आहे. त्यामुळेच भारतातील व महाराष्ट्रातील विद्यापीठानी आपल्या अभ्यासक्रमात पर्यटनाला विशेष महत्त्व दिले आहे. अशा अभ्यासक्रमावर आधारित हा ग्रंथ लिहिला आहे.
भारताला फार मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, त्याचाच वारसा आजही आपण जपत आहोत. भारताचे नैसर्गिक वेगळेपण, ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या वास्तू इमारती, किल्ले, प्रत्येक धर्माची धार्मिक अधिष्ठाने, कलाकौशल्यानी समृध्द शिल्पे, लेणी, भव्य-दिव्य समुद्र किनारा यामुळेच भारत हा जगातील इतर देशासाठी आकर्षक असे पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळविलेला देश ठरतो आहे. अजंठा वेरूळच्या प्राचीन लेण्या, आग्याचा ताजमहाल, दिल्लीचा लालकिल्ला यासारखी ठिकाणे युनोस्कोनी जागतिक पर्यटन केंद्रे म्हणून निश्चित केलेली आहेत.
या ग्रंथात पर्यटनाचे स्वरूप, व्याख्या, महत्त्व, त्याचे प्रकार याबरोबरच भारतीय संस्कृ तीत विकसित झालेले निरनिराळे धर्म या धर्माची पवित्र तिर्थस्थळे इतर महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, लेणी, राजवाडे यांचा ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने मागोवा घेतला आहे. शिवाय पर्यटनाला चालना देणाऱ्या (उदा. प्रवास, निवास, भोजन, मार्गदर्शक) इ. घटकांचाही आढावा घेतला आहे. निरनिराळ्या वास्तूंची छायाचित्रासह माहिती दिलेली आहे. अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी संदर्भ साधनांच्या आधारे माहिती संग्रहीत केली आहे त्यामुळे पर्यटक, वाचक, प्राध्यापक, विद्यार्थी व इतिहास प्रेमींना हा ग्रंथ निश्चितच आवडेल अशी अपेक्षा आहे.. )
०००

११) ऐतिहासीक कागदपत्रे व स्थळे- प्रा.डॉ. विकास कदम/ प्रा.डॉ. बाळकृष्ण माळी: (दुर्मीळ पुस्तक, प्रकार- ऐतिहासिक, माहितीपर, ऐतिहासिक साधने, संदर्भ साधन, अभ्यासपूर्ण, इतिहास लेखनशास्त्र, इतिहास लेखन पध्दती, इतिहास संशोधन पध्दती )

( इतिहास विषयात बी.ए. ची पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इतिहास लेखनशास्त्र किंवा इतिहास लेखन पध्दती अभ्यास करावा लागतो. इतिहास म्हणजे काय? इतिहासाच्या व्याख्या, प्रकार, इतिहास संशोधन पध्दती, इतिहासाची साधने, वस्तूसंग्रालये, भारतीय इतिहासकार इत्यादी गोष्टी माहित करुन घेणे आवश्यक आहे. त्याचा विचार करूनच हा ग्रंथ लिहीण्याचा प्रयत्न केला. बी.ए. पदवी पासून पुढे संशोधनात घेतल्या जाणाऱ्या एम.फिल. व पीएच.डी. पदवीपर्यंत या ग्रंथाचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग होईल.
"ऐतिहासीक कागदपत्रे व स्थळे" या ग्रंथात इतिहास लेखनात कागदपत्रांचे असणारे महत्व व त्याची जपणूक, इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने ऐतिहासीक स्थळांचे महत्वाची बारकाईने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन पेपर तयार करण्यास व विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टीने या ग्रंथाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. ग्रंथलेखनासाठी इंग्रजी व मराठी संदर्भ साधनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेट/सेट, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीनेही हा ग्रंथ महत्वाचा ठरेल. इतिहासाचे प्राध्यापक, विद्यार्थी व इतिहासप्रेमी यांना हा ग्रंथ निश्चितच आवडण्यासारखा आहे. )
०००

पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

★लोकसाहित्यावरील पुस्तके सवलतीत उपलब्ध !१.लोकपरंपरेतील खेळ: प्रभाकर मांडे, संज्योत महाजन (मूळ किंमत -₹२५०)-₹२००/-भारतात ...
15/08/2026

★लोकसाहित्यावरील पुस्तके सवलतीत उपलब्ध !

१.लोकपरंपरेतील खेळ: प्रभाकर मांडे, संज्योत महाजन (मूळ किंमत -₹२५०)-₹२००/-
भारतात परंपरेने चालत आलेल्या कला आणि क्रिडा यांचे स्वरुप पाहिले तर भारतीय जीवनाचे परंपरेने चालत आलेले हे निराळेपण ठळकपणे दिसून येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरेचे, संचिताचे, दर्शन घेण्याचा आणि घडविण्याचा प्रयत्न करण्याच्या ध्यासातूनच या परिचय-पुस्तकाचे लेखन झाले आहे.
०००

२.लोकचित्रकला - प्रभाकर मांडे,अंजली दिवेकर -₹२५०/-
भारतातील लोकचित्रकलेसंबंधीच्या या ग्रंथात आदिमकाळातील गुहाचित्रांपासून निरनिराळ्या कालखंडांतील विविध चित्रकलाशैलीसंबंधी चर्चा करण्याचा प्रयत्न करून भारताच्या निरनिराळ्या प्रांतांतील भित्तिचित्रे, चित्रपट्टिका, गोंदणचित्रे, रांगोळ्यांचे विविध प्रकार, पोथीवरील चित्रे इत्यादी संबंधीच्या माहितीसह आदिवासी जनजातींच्या चित्रकलाशैलींचाही विचार करण्यात आला आहे. त्याबरोबरच चित्रांच्या आधारे कथाकथन करण्याचा व्यवसाय करणाऱ्या जातीजमातींसंबंधीही माहिती दिली आहे.
०००

३.लोकरंगधारा - प्रभाकर मांडे -₹११०/-
भारताच्या नाट्यशास्त्रातील लोकधर्मी आणि नाट्यधर्मी यासंबंधीच्या समज- अपसमजाविषयीची चर्चा करून लोकरंगधारेतील प्रारंभी येणाऱ्या गण-गौळणीचे स्वरूप विशद करण्यात आले आहे. लोकरंगधारेतील उपासनाप्रधान, रंजनप्रधान आणि प्रबोधनप्रधान या तिन्हीही रंगधारा परस्परांशी संवाद राखून आणि परस्परांचे प्रभाव स्वीकारून प्रचलित राहिल्या आहेत. यासंबंधीची चर्चा करून लोकरंगधारेचे काही ठळक विशेष स्पष्ट करण्यात आले आहेत.
०००

४.लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी - प्रभाकर मांडे -₹१५०/-
इतिहास हा केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नसतो. तो भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांतील एक अर्थपूर्ण संवाद असतो. विशिष्ट इतिहासदृष्टी स्वीकारून केलेले घटनाक्रमांचे आकलन असते. आतापर्यंत अनेक इतिहासलेखकांनी इतिहासाचे लेखन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथात या सर्व इतिहासदृष्टींसंबंधी चर्चा करून इतिहासलेखनासाठी प्रचलित असलेल्या अनेक मूर्त-अमूर्त बाबी यांच्या अंतर्क्रियाही लक्षात घ्याव्या लागतात हे स्पष्ट केले आहे
०००

५.वाल्मीकी समाज-प्रभाकर मांडे (२८०) -₹२५०/-
अनेकविध कारणांमुळे लांबणीवर पडलेला, रेंगाळलेला एक लेखनप्रकल्प पूर्ण झाला आणि आता ‘वाल्मीकी समाज उत्पनी स्थिती आणि परिवर्तन)’ हे पुस्तक मराठी भाषकांना सादर करताना मला आनंद होत आहे.
माझा मोठा मुलगा दिल्ली शहराच्या सीमेवर फरीदाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत राहतो. त्याच्याकडे १९९६ मध्ये गेलो आणि काही दिवस राहिलो. त्याच्याकडे कामाला येणाऱ्या वाल्मीकी समाजाच्या महिलेमुळे तेथे होणाऱ्या वाल्मीकी जयंतीच्या उत्सवात मला सहभागी होता आले. तेव्हापासून माझ्या मनात वाल्मीकी समाजासंबंधी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली.
समाजातील वंचित आणि उपेक्षित घटक हा माझा आधीपासूनच जिव्हाळयाचा आणि अभ्यासाचा विषय होता. १९७१ ते १९८२ या काळात मी महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्तांच्या जीवनसरणींना आणि कथाव्यथांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. समाजाला फारसे ज्ञात नसलेले एक वेगळेच विश्व मला दिसले. त्यासंबंधीचा ‘गावगाड्याबाहेर’ हा ग्रंथ १९८३ साली प्रकाशित झाला. त्यानंतर १९९७ मध्ये माझ्या हातून ‘मांग आणि त्यांचे मागते’ या ग्रंथाचेही लेखन घडले होते. या पृष्ठभूमीवर आता अत्यंत उपेक्षित अशा वाल्मीकी समाजाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हापासून वाल्मीकी समाज हा माझा अभ्यासाचा विषय बनला. वाल्मीकी समाजाच्या स्थितिगतीसंबंधी त्याचप्रमाणे त्यांच्यांत होणाऱ्या परिवर्तनासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. हा ग्रंथ त्याचेच फलित आहे.
०००

६.मौखिक वाङ्मयाची परंपरा स्वरूप आणि भवितव्य-प्रभाकर मांडे (६००) -₹४७५/-
(पाने ६२२,प्रकार-चालीरीती, प्रथा, समाजदर्शन, अभ्यास, चिकित्सा, मौखिक म्हणी, वाकप्रचार, उखाणे,श्रमगीते, ओवी,ध्वनिगीते ,बालगीते, स्त्रियांची कथागीते/मौखिक खेळगाणी, कानबाईच्या गाण्यांची मौखिक परंपरा, इनामाय ,चक्रपूजाविधी-गाणी,मंत्रात्मक रचना,भविष्य कथन,धनगर,मातंग, गिरीवनातील जनजाती, तडवी भिल्ल यांची मौखिक वाङ्मय परंपरा)
समाजात परंरपेने अनेकविध स्वरूपांत मौखिक वाङ्मय प्रचलित आहे. दैनंदिन काम करताना, विधिविधाने पार पाडताना, खेळताना, खेळवताना, फेरावर नाचताना आविष्कारात्मक, कथात्मक किंवा संवादस्वरूप अशा कितीतरी प्रकारच्या रचना परंपरेने गायिल्या जातात. मंत्रस्वरूप किंवा मंत्रात्मक रचनाही रूढ आहेत. निरनिराळ्या जातीजमातींत मौखिक परंपरेने वाङ्मय चालत आले आहे. त्यांपैकी काहींची स्वरूपलक्षणे विशद करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. रूढ असलेले, भविष्यकथनाचे रचनाबंध, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यांचाही विचार केला आहे. समाजात
वाङ्मयाचे लिखित स्वरूपच आज आपणास अधिक परिचित असल्यामुळे या वाङ्मयाचे मौखिक स्वरूप अधोरेखित करणारा 'मौखिक वाङ्मय' हा द्विरुक्तिदोषानेयुक्त वाटणारा शब्दप्रयोग करणेच अधिक इष्ट वाटले.
०००

७. गावगाडा, जातगाव आणि जातगावचा पंचायत-प्र.मांडे
ग्रामरचना, गावगाडा, त्यातील वतनांची आणि जातधंद्यांची संकल्पना यांमुळे गावांत स्थिरावू न शकलेल्या परप्रांतीय जातीजमातींना भटक्यांचे जीवन जगावे लागले. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमी नसलेली जातगावे निर्माण केली. जातपंचायती निर्माण करून स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केली. त्याविषयीची तसेच या संस्थांची आजच्या काळातील प्रस्तुतता यासंबंधीची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे.
०००

८. साहित्यातील स्त्रीवादी विचारवैविध्य :किरण जगदाळे (२८०)-₹२४०/-
“स्त्री मुक्तीच्या अनेक अंगोपांगातील एक महत्त्वाचे साहित्यिक अंग म्हणून स्त्रीवादी साहित्य विकसित झाले. संपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संदर्भातच स्त्रीवादी विचारसरणीचे वेगवेगळे पैल नजरेत येतील. स्त्री ही स्त्री आहे म्हणून स्त्रीवादी असेलच असे नाही. . स्त्रियांनी लिहिलेली म्हणून ती पुस्तके स्त्रीवादी ठरत नाहीत. स्त्री अथवा पुरुष यांच्याविषयी कोणतीही भूमिका न घेता केलेले स्त्रियांचे लेखन स्त्रीवादी नसते. स्त्रियांनी स्त्रियांवर लिहिलेली पुस्तकेही पुरुषप्रधानतेला आव्हान करणारी असतातच असे नाही. उलट पुरुषप्रधान संस्कृतीने निर्माण केलेल्या भावनिक व वाङ्मयीन ढाच्यातच अनेक स्त्रिया लेखन करताना दिसतात. त्यामुळे स्त्री साहित्याची सर्वच वाङ्मयीन परंपरा स्त्रीवादी म्हणता येत नाही. स्त्रीकेंद्री साहित्याचा स्त्रीप्रधानतेशी (फेमिनिझम) काही संबंध असतोच असे नाही. "

९.लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व -प्रभाकर मांडे -₹१३०/-
(मूळ किंमत -१५०/-)
समरसता हे साहित्य मूल्य असावे. श्रेष्ठ साहित्य हे माणसांना जोडणारे असते. त्यांच्यात भावसंबंध निर्माण करणारे असते. एकमेकांच्या सुख-दुःखांत सहभागी होण्याची प्रेरणा देणारे असते किंवा असावे. तसे असेल तरच ते खऱ्या अर्थाने साहित्य. असा विचार, हे तत्त्व समाजात प्रस्थापित व्हावे असे आपल्याला वाटते. हे तत्त्व या देशात कित्येक हजार वर्षांपासून अंतर्हित आहे. ते पुन्हा उजागर करणे, त्यासंबंधीचे भान जागे करणे आणि जर तसे झाले तरच हा सांस्कृतिक प्रवाह सतत ऊर्जादायी, नवी दिशा देणारा राहील. हा प्रवाह कोणता? त्याचे स्वरूप काय? पुष्कळ वेळा आपण संस्कृती हा शब्द वापरतो, विविधता हा शब्द वापरतो, एकात्मता हाही शब्द वापरतो. ही एकात्मता आहे, जाणवते - ती का आहे, ती असण्याची प्रक्रिया केव्हापासून झाली आहे, कोणकोणत्या संदर्भात त्याचा आपल्याला प्रत्यय येतो? आपला स्वभाव काय आहे, आपली ओळख काय आहे?
०००

१०.लोकपरंपरेतील स्त्रीप्रतिमा-प्र.मांडे (२००) -१७५/-
"लोकपरंपरेतील स्त्रीच्या प्रतिमेचे स्वरूप पाहिले तर असे दिसते की, ती माहेरी आणि सासरी विविध भूमिकांत जगते. या भूमिकांतील तिचे जगणे हे परंपरेने निश्चित केलेले, संकेतबद्ध आणि काही हक्कांबरोबरच अनेक कर्तव्यांनी जखडलेले असते. परंपरेने चालत आलेल्या स्त्रियांच्या ओवीगीतांत स्त्रीच्या मनाची स्पंदने प्रकट झाली आहेत. त्यांतून तिची प्रतिमा खूपच गुंतागुंतीची, गहन, गूढ आणि एकाच वेळी सुसंगत व परस्परविरोधी वृत्तीप्रवृत्तींनी तयार झाली असून, प्रवाही राहिली असल्याचे दिसते. या प्रतिमेतून सतत एक कारुण्याची झाक जाणवत राहते. एकूण लोकपरंपरेतील स्त्रीची प्रतिमा कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, ‘हृदयी अमृत, नयनी पाणी' अशी असल्याचे दिसते."
०००

११.मिथक साहित्यातील यक्षप्रतिमा- दिनेश वाघुंबरे (४००) - ₹३२५/-
यक्ष आणि यक्षिणी' हे सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीच्या विलोभनीय बाह्य आणि आंतरिक परंपरेचे आश्चर्यकारक अविछिन्न अंग आहेत. वेदांतात ब्रह्मरूपात त्यांचे दर्शन होते तर त्रेता युगात कुबेराच्या रूपात ते दिसतात. कथासरित्सागरात, तथागत भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांत, तीर्थंकरांच्या चरित्रकथात, जनजातींच्या लोककथांत सर्वत्र ते व्याप्त आहेत. मातृदेवता असोत की अप्सरा असोत, यक्षांशी त्यांचे अभिन्न नाते. अगदी आजही ग्रामीण जीवनात आसरांच्या रूपात त्यांचे दर्शन होते. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, कला, शिल्प, साहित्य किंबहुना भारतीयांचे परिपूर्ण जनजीवन कळत न कळत त्यांनी व्यापलेले आहे. पंडित, वेदज्ञ, धर्मज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ते, समाजशास्त्रज्ञ अशा सर्वांच्याच कुतुहलाचा, अभ्यासाचा हा विषय आहे.
'मिथक साहित्यातील यक्षप्रतिमा' या ग्रंथात लोकदेव, लोकधर्म, लोकजीवन आणि लोकसाहित्य या साऱ्यांचा एक नैसर्गिक समन्वय आणि संस्कृतीची सुसूत्रता लक्षात येते. हा ग्रंथ केवळ संशोधन वा प्रतिभासाधन नाही, तर भारतीय संस्कृतीच्या एका समस्यापूर्तीचा प्रयत्न आहे. परिपूर्ण संदर्भ देत निष्कर्षाप्रत पोहोचविणाऱ्या उपसंहारापर्यंतच्या सहा प्रकरणांतून केलेली मांडणी शास्त्रीय, तर्कसंगत आणि दिशादर्शक आहे. केनोपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर 'विजानीहि किमेतत् यक्षमिति' असा हा ग्रंथ आहे.
०००

१२. नृत्त, नृत्य आणि नाट्य-प्र.मांडे (२००)-₹१७५/-
भारतीय कला सर्वसाधारणपणे प्रतीकात्मक असते. त्यापासून भारतीय माणूस प्रेरणा घेत होता. स्फूर्ती घेत होता. जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा घेत होता व अजूनही घेतो. वेदकाळापासून परंपरेने चालत आलेली कलेकडे पाहण्याची ही दृष्टी काही अपवाद वगळता आजही प्रवाही असल्याचे दिसते.
भारताने प्राचीन काळापासून कलेकडे आध्यात्मिक दृष्टिकोनानेच पाहिले आहे. कलेची निर्मिती एका संचारित अवस्थेतून होते असे मानले आहे. कलेच्या सर्जनाविषयीच्या धारणा, त्यासंबंधीचे गूढत्व यांच्या मुळाशी काही आध्यात्मिक तत्त्वे आहेत असे भारतीयांना वाटते. विश्वाचे सर्जन नटराज शिवाच्या नृत्यातून घडल्याचे भारतीय मानतात. त्याप्रमाणेच सृष्टीची निर्मितीही कलेतूनच घडल्याची त्यांची श्रध्दा आहे.
भारतीय शास्त्रीय व लोककलांमधील नृत्याच्या तीन मूलभूत संकल्पनांवर या पुस्तकात सखोल भाष्य करण्यात आले आहे.
भारतीय कला, लोककला, शास्त्रीय नृत्य आणि नाट्य परंपरांचे स्वरूप व त्यांच्यातील तात्विक फरकाचे सखोल विवेचन केले आहे.
०००

📨पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

★ हिंदी -मराठी चित्रपट, नाट्य,संगीत  विषयक समीक्षा, परीक्षण, आत्मचरित्र,चरित्र,आठवणी किस्से विषयक काही दुर्मिळ पुस्तके उ...
13/08/2026

★ हिंदी -मराठी चित्रपट, नाट्य,संगीत विषयक समीक्षा, परीक्षण, आत्मचरित्र,चरित्र,आठवणी किस्से विषयक काही दुर्मिळ पुस्तके उपलब्ध!

१.अमिताभ- सौम्य बंद्योपाध्याय- अनु. अशोक शहाणे:
(दुर्मीळ पुस्तक ,डिलक्स हार्डबाऊंड आवृत्ती, रंगीत दुर्मीळ छायाचित्रांसह,प्रकार- चरित्रग्रंथ, सिनेविषयक, अभिनेता, व्यक्तिदर्शन,अशोक शहाण्यांनी बंगालीतून मराठीत अनुवाद केलेले अमिताभचे चरित्र)

'अमिताभ बच्चन' अन् 'यश' हे समानार्थी शब्द आहेत. हे यश, ज्याच्याकडं लोकं डोळे विस्फारून बघत असतात अन् जे मिळायची स्वप्नं लोकं बघत असतात. काय केलं म्हणजे ते कमावता येतं? किंवा वेगळ्या प्रकारे म्हणायचं तर अभिनय तर इतकी लोकं करत असतात, त्यांच्यात अमिताभ बच्चन एकच जण का होतो ? चांगल्यात, आणखी चांगल्यात, आणखी चांगल्यात न् सर्वोत्तमात फरक का म्हणून असतो नि तो कसा काय तयार होतो, नि हया घडणीच्या वाटेवर कोणकोणत्या शक्ती काम करत असतात? एक बळकट कौटुंबिक बंध कसा नि कितपत वाट दाखवत जातो, किंवा मुळात तो वाट दाखवतो तरी का ? थोडक्यात अमिताभ बच्चनसारख्या माणसांचं रसायन काय असतं ? हे कुतूहल निव्वळ आजचंच नाही, ते अनंत काळाचं आहे.
या पुस्तकाच्या पानापानांतून सौम्य बंद्योपाध्याय हेच हुडकत हिंडले आहेत. अगदी मामुली रूप असलेला एक माणूस हलकेहलके एका अख्ख्या पिढीचं प्रतीक कसा काय बनत जातो ? करमणुकीच्या जगाचा एकछत्री सम्राट म्हणून स्वतःला प्रतिष्ठित करतो ? अन् नखशिखांत फिल्मी दुनियेतला असूनसुद्धा तिथल्या इतर चारचौघांपासनं स्वतःला वेगळं काढून आपल्याभोवती एक रहस्याचं वलय पैदा करून ठेवतो ? कसं काय घडून येतं हे सगळं ? हया भटकंतीतून हाती काय लागतं? तर अमिताभ बच्चन हे एक कोडं आहे. ते सोडवायचा प्रयत्न करणंसुद्धा फार अवघड आहे. अमिताभ बच्चन हा हॅलेचा धूमकेतू आहे. तो शंभर वर्षांतनं एकदाच बघायला मिळतो.
सौम्य बंद्योपाध्यायांची विवेचक लेखणी नि शोधक नजर बॉलिवुडच्या मुकुटहीन सम्राटाची हया पुस्तकातनं एक नवीच ओळख करून देते. मोठंच आवश्यक काम. या कामाला आतापर्यंत कुणी तसा हातच घातला नव्हता.
अमिताभच्या प्रदीर्घ सहवासात राहून, कैक सनसनाटी सत्य घटना त्यांनी उकरून काढल्या आहेत, अमिताभच्या 'सुसंस्कृत' व्यक्तिमत्त्वाचा नव्याने शोध लावला आहे. संग्रही असायलाच हवा असा हा 'बंगाली वाण' अशोक शहाण्यांनी तोडीस तोड 'मराठी साज' चढवून आपल्या दारापर्यंत आणून पोचवलाय.
०००

२.बेस्ट ऑफ व्ही. शांताराम- भाई भगत: ( दुर्मीळ पुस्तक , प्रकार- चरित्र, व्यक्तिदर्शन, अभिनेता, दिग्दर्शक, सिनेमाविषयक, किस्से, आठवणी )

( भारतातील मूकपटांच्या सुरुवातीच्या काळातच बाबूराव पेंढारकरांनी आपल्या मावसभावाला चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली व्ही. शांताराम या नावाने कामाला लावले आणि ‘लक्षपूर्वक शीक' असा सल्लाही दिला. मुळातच तंत्राची आवड असणाऱ्या व्ही. शांताराम यांनी अल्पावधीतच अतिशय मेहनतीने चित्रपट माध्यमाची सर्व अंगे आत्मसात केली आणि आपल्या गुरूंची शाबासकी मिळवली.
पुढे आपल्या चार भागीदारांसमवेत 'प्रभात' फिल्म कंपनीची सुरुवात करून दिग्दर्शन आणि संकलन या माध्यमांवर आपले प्रभुत्व सिद्ध केले. प्रभात ही संस्था भारतभर प्रसिद्ध झाली, तसेच व्ही. शांताराम हे एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून ख्यातकीर्त झाले. प्रभातमधल्या मतभेदानंतर त्यांनी पुण्याहून मुंबईला येऊन स्वतंत्रपणे एकट्याची ‘राजकमल' ही संस्था स्थापन केली आणि मुंबईतल्या चित्रपटांच्या मोठ्या बाजारपेठेत एकट्याने स्वबळावर भक्कम पाय रोवून
‘राजकमल'चे स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले. अशा या शांतारामबापूंना भाई भगत यांनी एकलव्याप्रमाणे कायम गुरुस्थानी मानले. त्यांच्याच प्रभातमधील 'कुंकू', 'माणूस', 'शेजारी' आणि राजकमलच्या 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'दो आँखे बारह हाथ' आणि 'नवरंग' या चित्रपटांचा माहितीवजा आढावा घेणारे हे पुस्तक आहे. एक प्रकारे शांतारामबापूंना वाहिलेली ही आदरांजली आहे.
सिनेमा हे भाई भगत यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते. सिनेमावरचे त्यांचे प्रेम, निष्ठा आणि अभ्यास यामुळेच त्यांनी सदैव याच विषयावर विपुल लेखन केलेले आहे. त्यामुळे सिनेमाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचे नाव आणि लेखन दोन्हीही नक्कीच सुपरिचित आहे. )
०००

३.रेखा ओ रेखा- मोहन दीप: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- व्यक्तिदर्शन, माहितीपूर्ण, चरित्रविषयक, सिनेविषयक, अभिनेत्री, किस्से)

रेखा.... क्षणोक्षणी बदलणारी प्रतिमा.... उद्योग आणि मिडिया यांनी तयार केलेली प्रतिमा...‘रेखा...' हे नाव घेतलं रेखाच्या अर्ध्या वयाच्या मुलींचे पाय लटपटू लागतात, चित्रपटसृष्टीतील तर सोडाच पण, आम जनतेला, लाखो करोडोंना पडणाऱ्या स्वप्नांची राणी रेखाच... हेच आता समीकरण झालं आहे.
थोडक्यात सांगायचं तर, रेखा जुन्या, मुरलेल्या मधासारखी आहे. 'ओल्ड वाईन' हे नाव तिला 'फिट' आहे... हिन्दीत सांगायचं तर,
आजचा सफल खलनायक आणि एके काळचा रेखाचा प्रियकर किरणकुमार म्हणतो, “रेखा एका 'टॉनिक' सारखी होती. जीवनातला उत्साह तिच्यातून ओसंडून वाहायचा. आणि आज... .? आज ती एखाद्या जुन्या मधाप्रमाणे परिपक्व आहे. जुन्या मधाची एक खासियत आहे. तसंच तिचंही काहीसं ... चैतन्यानं सळसळणारं सरोवर होती ती पूर्वी. तिच्याबरोबर असण्याचा अर्थ एवढाच होता की, आपण खरोखरंच जंगतोय, असं भासायचं..."
रेखाला आणि किरणला वेगळं होऊनही आज पाव शतकाचा काळ लोटलाय. तरीही तिच्याबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात चमक आहे. त्याच्या डोळ्यातली चमक क्षणोक्षण वाढत जाते आणि तो म्हणतो, "रेखा प्रत्येक माणसाची आवड आहे. कोणताही मनुष्य तिच्याकडे सहज आकर्षिला जातो, खेचला जातो.
राजीवकुमारचे विचारही साधारण याच प्रकारचे आहेत. राजीव आधी सैन्यामध्ये मेजर होता. नंतर तो या चंदेरी दुनियेत आला आणि त्याने दहा चित्रपट बनवले. त्याने दोन चित्रपटांसाठी रेखाला करारबद्ध केलं. रेखांच्या प्रकरणात आपलं लग्न तुटता तुटता वाचलं, हे राजीव स्पष्टपणे सांगतो. राजीव जे काही सांगतो ते खरं तर लोकांच्या मनातलंच सांगतो. जे पुरुष रेखाचे प्रेमी होते, ते आता म्हातारे झाले आहेत. पन्नाशीत गेले आहेत, काहींचा मृत्यू झाला. रेखाबरोबर चित्रपटात काम करणाऱ्या पुरुषांबाबत सांगायचं तर, त्यांच्या चेहऱ्यांवर आता सुरकुत्या पडल्या आहेत, काहींचे केस गायब झाले आहेत, काहींना शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत, काही आजोबा बनले आहेत... याहूनही महत्त्वाचं म्हणजे, त्यावेळचे नायक आता भूमिका केल्यास बाप, काका आदी भूमिका रंगवत आहेत.
एकेकाळी रेखाबद्दल स्वप्न रंगवणारे लोक आज आपलं तारुण्य कुठेतरी हरवून बसले आहेत. आणि रेखा...? ती मात्र जिथल्या तिथे आहे. तिच्यात दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता गेली तीस वर्षं ती इंडस्ट्रीत आहे. त्यातही दहा वर्षं ती लोकप्रियतेच्या टोकावर होती. एवढा काळ स्वतःला 'मेनटेन' ठेवणं, काही साधं काम नाही.
तिच्यासाठी ‘वय' हा प्रश्नच उद्भवला नाही. वयातले चढउतार तिने अनुभवले नाहीत. 'काळ' जणू थांबून राहिला होता तिच्यासाठी... असं वाटावं असं चित्र आजही ती समोर आल्यावर दिसतं... तिने अमरत्वासाठी, त्यापेक्षाही चिरयौवन स्थितीसाठी अमृतप्राशन केलं आहे, असा भास होतो. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याची कलासुद्धा रेखाने आत्मसात केली आहे.
रेखा म्हणजे, हिन्दू पौराणिक कथेमधील विश्वामित्राची तपस्या भंग करणारी मेनका... मेनकेचं आधुनिक रूपच ते...!
रेखा काळाच्या भोवऱ्यातून बाहेर पडली आहे. तिने आयुष्यात अनेक टक्केटोणपे खाल्ले आहेत. रेखा स्पर्शाच्या सीमारेषेबाहेर आहे. ती कार्टूनमधील 'फॅन्टम' प्रमाणे आहे. आपण तिला स्पर्श करू शकत नाही. आजपर्यंत कुणीच तिला मिळवू शकलं नाही किंवा तिच्या अंतर्मनाला स्पर्शही करू शकलं नाही. आजही ती एका अर्थाने कुमारिकाच आहे. एक अशी कुमारिका, जी तिच्या पहिल्या तेलगु चित्रपटासाठी, अर्थात 'अम्माकोसन'साठी आपली मावशी अंजलीदेवीच्या समोर उभी आहे..
आता... आता साऱ्या स्मृती धूसर झाल्या आहेत, तिचं झालेलं शोषण ही आता बऱ्याच काळापूर्वीची गोष्ट झाली आहे... ते कधी झालंच नाही, असंही आता कधीतरी वाटतं.. आज पुन्हा एकदा कुमारिकेच्या सौंदर्याने नटलेली, लावण्यवती रेखा आपल्यासमोर आहे. पुराचं सारं पाणी ओसरलंय... रेखाचं आयुष्य धुवून ती पुन्हा नव्या रूपात आपल्यासमोर प्रकटतेय....
पौराणिक कथांमधली चिरतरुण, कुमारिका म्हणजे रेखा... तिच्याबद्दल अधिक काय लिहावं...?
- मोहन दीप )
०००

४.वसन्त शिन्दे- संपा. वि. भा. देशपांडे: ( दुर्मीळ पुस्तक ( दुर्मीळ छायाचित्रांसह), प्रकार- चरित्र, सिनेविषयक, नाट्यविषयक, व्यक्तिदर्शन, व्यक्तिचित्रे, आठवणी, किस्से)

( वसंतराव शिंदे यांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवाचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. मूकपटाच्या काळापासून सतत साठ-बासष्ट वर्षे आजतागायत अभिनेते म्हणून काम करीत असलेले शिंदे हे एकमेव मराठी कलाकार आहेत. चित्रपटाच्या बरोबरीने त्यांनी रंगभूमीचे क्षेत्रही तितक्याच आत्मविश्वासाने पादाक्रांत केलेले आहे. मूकपट-बोलपट आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत इतक्या सातत्याने आपली प्रतिमा एका विशिष्ट उंचीवर निर्माण करणारे आणि रसिकांना प्रिय असणारे कलाकार सहसा विरळाच. अशांपैकी शिंदे हे एक अग्रगणी कलाकार आहेत.
अशा गुणी कलाकाराचा सन्मान जाहीरपणाने होणे उचितच आहे. पण त्याचबरोबरीने त्यांचा जीवनपट, कलाक्षेत्रातील कारकीर्द यांचाही आलेख रसिक वाचकांसमोर असावा अशी कल्पना समोर आली, म्हणून या पुस्तकाचा प्रपंच थाटला गेला. शिंदे हे लेखक नव्हेत, त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र, आत्मकथनपर असे लेखन कधीच केले नाही. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक तशा नोंदीही केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जेवढी माहिती आठवली तेवढी आणि तशी मुलाखतरूपाने एकत्रित केली. ती मुलाखत या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. त्यांच्या एकूण कारकीर्दीचा आढावा घेणारा आणि त्यांच्या व्यक्तिजीवनाची, कलाजीवनाची वैशिष्ट्ये सांगणारा एक लेख यामध्ये आहे. तसेच ज्यांनी त्यांच्याबरोबर नाटक आणि चित्रपटांत सातत्याने भूमिका केल्या, त्यांची मैत्री संपादन केली, अशा कला वंतांपैकी चित्तरंजन कोल्हटकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर यांच्या लेखांचाही समावेश या पुस्तकात केला आहे. त्यामध्ये शिंदे एक माणूस आणि कलाकार यांचे दर्शन आपल्याला घडू शकेल.
शिंदे यांनी असंख्य नाटक-चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. अद्यापही ते या क्षेत्रांत वावरत आहेत. त्या सर्व नाटक-चित्रपटांच्या नावांची सूची पुस्तकाच्या अखेरीस जोडली आहे. त्यावरून त्यांच्या एकूण कारकीर्दीचा अंदाज आपणाला येऊ शकेल. याच्या जोडीला अर्थातच शिंदे यांची विविध छायाचित्रे दिलेली आहेतच. अशा अनेक दृष्टीने हे पुस्तक वसंत शिंदे यांच्या जीवनाचे दर्शन घडविणारे आहे. रसिकांना संग्रही ठेवावे असे वाटेल असा विश्वास आहे.
असे वेगळ्या प्रकारचे पुस्तक प्रकाशित करण्याचे काम श्रीविशाखा प्रकाशनचे राजा फडणीस यांनी आनंदाने स्वीकारले. चाकोरीबाह्य स्वरूपाची पुस्तके काढण्याचा त्यांचा लौकिक आहे. त्याला साजेल असे हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे.
अशा काहीशा वेगळ्या पुस्तकाला मुखपृष्ठ करायचे म्हणजे सुभाष अवचट यांच्याशिवाय कोणाकडे हक्काने जायचे ? तो प्रेमाचा हक्क त्यांनी आणि उत्तम मुखपृष्ठ तयार करून दिले. मानला.
हे पुस्तक सिद्ध होण्यासाठी खुद्द वसंतराव शिंदे, त्यांचे सुपुत्र विनोद, पूना गेस्ट हाउसचे चारुदत्त सरपोतदार, दादासाहेब फाळके यांचे कुटुंबीय, चित्तरंजन कोल्हटकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर अशा अनेकांचे साह्य झाले. त्यामुळेच हे पुस्तक आपल्या हाती देताना आनंद होतो आहे. )
०००

५ नादचित्ररंग- गंगाधर महाम्बरे: ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- चित्रपटविषयक, अभिनेते, संगीतकार, गायक, व्यक्तिचित्रे, संगीतविषयक, व्यक्तिदर्शन, आठवणी, किस्से, ललित लेखन)

( गंगाधर महाम्बरे यांनी चित्रपटसृष्टीमधील विविध अंगांचा घेतलेला धांडोळा.)
०००

६.चंदेरी चित्रहार- रा. ग. जाधव: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- चित्रपटविषयक, ललित लेख, व्यक्तिदर्शन, आठवणी, किस्से, हंस व मोहिनी मासिकात आलेले लेख )

( चित्रपट हा विषय समाज, संस्कृती व कला अशा सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. मात्र त्या विविधांगी महत्त्वाचे मर्म समजून घेण्याइतकी विविधांगी क्षमता, रसिकता माझ्याजवळ आहे, असे मला वाटत नाही. अनेकांना आवडतो, तसाच मलाही चित्रपट आवडतो; तथापि अनेकांना असते, तेवढेच बेताचे ज्ञान या बाबतीत मला आहे. चित्रपटाचा वेडा चाहता मी होऊ शकत नाही आणि वेडाशिवाय कसलीही कोडी उलगडता येत नाहीत, असे रास्तपणे समजले जाते. तेव्हा चित्रपटाविषयी अधिकारवाणीने काही बोलण्याचा माझा दावा नाही.
चित्रपटविचार हा विषय, वर म्हटल्याप्रमाणे गुंतागुंतीचा व सखोल अभ्यासाचा असला, तरी किंवा बहुधा त्यामुळेही, तो काहीसा उपेक्षितच राहिलेला आहे. चित्रपटांविषयी विचार करावयाचा-सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक दृष्टींनी विचार करावयाचा; म्हणजे तरी नेमके काय करावयाचे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात मी केलेले प्रस्तुत पुस्तकातील लेखन हे चित्रपटसमीक्षेची केवळ काही वळणेच दर्शविणारे ठरावे, हे स्वाभाविक आहे. हाही चित्रपटसमीक्षेतील एक प्रायोगिक प्रयत्न एवढ्याचपुरता अर्थपूर्ण ठरेल. वाचकांनी त्या दृष्टीनेच या पुस्तकाकडे पहावे, असे मी म्हणेन. काही अभिनेते, काही अभिनेत्री, काही विषय, काही सांस्कृतिक संदर्भ मला वेळोवेळी वेधक वाटले. या वेधकतेचा मागोवा घेण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे.
हे लेखन 'मयूरपंख' (अमिताभ व सोंगाड्या), 'मोहिनी' व 'हंस' (रंजना, शबाना, हेमा मालिनी इ.),' अबोली' (दादा कोंडके), ' इंद्रधनुष्य' (चित्रपट आणि संस्कृती) इ. नियतकालिकांतून प्रसिध्द झाले. या सर्व नियतकालिकांच्या संपादकांचा मी ऋणी आहे. विशेषतः आनंद अंतरकरांनी माझ्या या चित्रपटीय लेखनाचा स्नेहभावाने सतत पाठपुरावा केला आहे व मला 'लिहिते' ठेवले आहे. त्यांचे ऋण मी मानतो.
मराठी चित्रप्रेक्षकांना माझ्या या लेखनामुळे चित्रपट पाहण्याबरोबरच, त्याच्याविषयी काही एका दिशेने विचार करण्याची, विचार ऐकण्याची जिज्ञासा जाणवल्यास मला आनंद होईल.-रा. ग. जाधव )
०००

७.गोष्ट नेपथ्याची- बापू लिमये: ( दुर्मीळ पुस्तक , प्रकार- नाटकाच्या नेपथ्याची कहाणी, आत्मकथन, नाट्यविषयक)

( मूळ मुद्दा आहे तो 'गोष्ट नेपथ्याची' एका प्रतिभाशाली नेपथ्यकाराने सांगण्याचे मनात आणले, आणि त्या मनोगताला मोठे मनोरम असे नाट्यात्म कथारूप त्याने दिले. एकूणच मराठी नाटकाच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. आणि ही कथा वाचत असताना, मला जे भावले ते हे की, बापू लिमये नावाचा हा नेपथ्यकारच केवळ प्रतिभाशाली आहे असे नाही, तर त्या एका नेपथ्यकारात अन्तर्हित असलेला जो कथाकार आहे, तोही प्रतिभाशाली आहे. आणि म्हणून ही कथा एका नेपथ्याची विलक्षण परिणामकारक अशी उतरली आहे.
- माधव मनोहर )
०००

८.नाटककार बेंडे व्यक्ती आणि वाङ्मय - प्रा. भास्कर कुलकर्णी
(दुर्मिळ पुस्तक, प्रकार संक्षिप्त चरित्र, व्यक्ती दर्शन ,नाट्य परीक्षण,तुलनात्मक अभ्यास)

मराठवाड्याचे पाहिले प्रतिभावंत नाटककार कै.श्रीपाद नृहसिंह बेंडे यांच्या जीवन -चरित्राचा आणि त्यांच्या नाट्य कारकीर्दचा परिचय )
०००

९.नाट्य- विचार -डॉ अनंत देशमुख (दुर्मिळ पुस्तक,प्रकार नाट्य समीक्षा ग्रंथ)

मराठी नाटक आणि मराठी रंगभूमी यांच्यासंबंधाने दर्जेदार मराठी नियतकालिकांतून सकस लेखन करणारे नाट्यसमीक्षक म्हणून डॉ. अनंत देशमुख आता सर्वांना परिचित झाले आहेत. नाटकाच्या केवळ संहितेचा विचार करून डॉ. देशमुख थांबत नाहीत, तर रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोगही त्यांच्या समीक्षेचा लक्ष्यबिंदू ठरतो. मराठीमध्ये अगदी आरंभकाळापासून नाटक हा कलाप्रकार समाजसंमुख चळवळ म्हणून प्रवाहित होत राहिलेला आहे, हे लक्षात घेऊन डॉ. देशमुख त्याही दिशेने नाटकाचा अभ्यास करु पाहातात.
प्रस्तुत संग्रहातील 'मराठी नाटक, प्ररणा व स्वरुप ', आणि ' सांस्कृतिक संदर्भ व मराठी नाटक हे दोन्ही लेख मराठी नाटकाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे नवे आकलन - अवलोकन घडवितात. 'नाटक आणि रंगभूमी: अभ्यासाच्या काही दिशा' आणि 'छबिलदास चळवळ: स्थिती आणि गती' हे या संग्रहातील लेख रंगभूमी संबंधाने काही डोळस निरीक्षणे मांडणारे आहेत. ' गडकरी पुनर्विचार' हा दीर्घ शोध निबंध गडक-यांच्या नाटकांच्या सूक्ष्मलक्षी संहिताचिकित्सेचा एक वस्तु पाठच ठरावा. -
डॉ. मु. श्री कानडे यांच्या 'नाटयशोध 'च्या पाठोपाठ ' नाट्यविचार' प्रकाशित करून ' नीहारा प्रकाशन ' ने मराठीचे नाट्यसमीक्षा क्षेत्र निश्चित विस्तारित केले आहे.
- डॉ. जयंत वष्ट
०००

१०.चित्र मनातलं -अशोक राणे ( दुर्मिळ ,प्रकार -चित्रपट विषयक लेख)

श्री. राणे यांच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे 'चित्र मनातलं.' हे सदर 'सकाळ'च्या गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या 'कलारंजन' पुरवणीत १९९४ साली आम्ही प्रसिद्ध केलं. दर अंकात एका वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचं सौंदर्य आणि महत्त्वाच्या दृश्याचे परिणाम, घटक उलगडून दाखवण्याचं काम श्री. राणे यांनी या सदरात केलं. तेव्हा हे सदर लोकप्रिय होतंच, परंतु आता तीन वर्षं उलटून गेल्यानंतर आजही रसिक वाचक त्याची आठवण काढतात ही त्याच्या यशाची आणि उपयुक्ततेची पावती आहे, असं मी मानतो. या सदरातून श्री. राणे यांनी जवळजवळ एकतीस चित्रपटांचा मागोवा घेतला आहे. हा कालखंडही पन्नास वर्षांहून मोठा आहे. 'सुजाता', 'बंदिनी', 'देवदास', 'मुगले आझम'पासून काल-परवाच्या ‘अनुभव', 'दस्तक', ‘चष्मेबद्दूर' पर्यंत विविध प्रकारच्या चांगल्या चित्रपटांचा यात समावेश आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात एवढेच चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण, वेगळे, दर्जेदार असतील असं नाही. पण ही केवळ वानगी आहे. झलक आहे. हे चित्रपट आपणही पाहिलेले असतात, आपल्यालाही ते आवडलेले असतात. त्यातली काही दृश्यं, गाणी, अभिनयछटा असं काही ना काही आपल्याही मनात घर करून राहत असतं. प्रत्येकवेळी त्याचं कारण आणि त्यातली कलासंपन्नता आपल्या लक्षात येतेच असं नाही. जे आपल्याला भावलं त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय? परिणामकारकता का आणि कशी, चित्रपट माध्यम म्हणून त्यातलं सामर्थ्य कोणतं? या प्रश्नांचा राणे यांनी घेतलेला शोध म्हणजे 'चित्र मनातलं'.
०००

११.लीजंडस् - अभिजित देसाई ( नवीन पुस्तक, प्रकार -चित्रपट विषयक, व्यक्ती दर्शन)

अशोककुमार, राज कपूर, देव आनंद, गुरु दत्त, दिलीपकुमार, विजय आनंद, अमिताभ बच्चन हे आहेत भारतीय सिनेमाचे महानायक. चित्रपटसृष्टीला समृद्धी मिळवून देण्यात या महानायकांचा प्रवास कारणीभूत ठरलेला आहे. प्रत्येकाची एक स्वतःची अशी जीवनशैली आहे. चित्रपटसृष्टीला व्यापक रूप देताना त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अनेक चढ-उतार आले. यात कौटुंबिक नातेसंबंध, प्रेमप्रकरणे याचा घेतलेला ' मागोवा हे
महानायक 'लीजंडस्' असल्याचे सांगते.
०००

१२.शिणेमा डॉट कॉम- शिरीष कणेकर (दुर्मिळ पुस्तक, चित्रपट संगीत विषयक लेख,आठवणी ,किस्से)

माझी काही पुस्तके गेली काही वर्षे बाजारात उपलब्ध नाहीत. त्यांच्या आवृत्त्या संपल्या आहेत. विक्रेते, वितरक, वाचनालये व वाचक यांच्याकडून वारंवार नवीन आवृत्तीची चौकशी होत होती. परंतु त्यातील काही मजकूर शिळा झाल्याने कालबाह्य ठरला होता. तो नव्याने वाचकांच्या पानात वाढणे उचित नव्हते. उदाहरणार्थ, 'बॉबी'च्या यशाचे रहस्य किंवा 'जितूची जीत कशात आहे?' किंवा 'रेखा ओ रेखा' हे लेख आता संदर्भहीन वाटतील. याउलट 'शक्ती' चित्रपटातील दिलीपकुमार- अमिताभ बच्चन यांच्या अभिनयद्वंद्वावरील 'उभे ठाकले झुंजाया' किंवा लता मंगेशकरच्या पहिल्या भेटीचा उमाळा 'एक वेडा पीर लताला भेटतो' याचं अप्रूप आज इतक्या वर्षानंतरही माझ्या लेखी कायम आहे. वाचकांनाही त्यांच्यात रुची असावी अशी माझी धारणा आहे. त्यामुळे 'फिल्लमबाजी' (१९८०), 'शिरीषासन' (१९८३), 'पुन्हा शिरीषासन' (१९८५) व ' कणेकरी' (१९९१) या संपून गेलेल्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढण्यापेक्षा त्यातील निवडक लेखांचे संकलन करून पुस्तकरूपाने देणे मला सयुक्तिक वाटले. 'गाये चला जा' च्या पहिल्या आवृत्तीतील 'गाये लता, गाये लता' व 'गोड गळ्याचा गझलसम्राट' पुढील आवृत्त्यांतून वगळले होते. म्हणून त्यांचा आवर्जून समावेश केलाय. जोडीला 'देव भक्तांना मुकला' व 'आहे न भरीं' या नव्याकोऱ्या लेखांची भर घालून हा फिल्मी चाट मसाला सादर करीत आहे. अवश्य चाखावा.
शिरीष कणेकर
०००

पोस्टेज वेगळे.

📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .

⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+918799821809

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Book Roof Online Book Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Book Roof Online Book Store:

Shortcuts

Share

Category