23/07/2023
Kanchan Moghe Badamikar
कीर्तने वाडा देवस्थान (राजुरी) - प्रति पंढरपूर
उद्या आषाढी एकादशी. म्हणजेच सर्व भक्तांसाठी पर्वणीचा दिवस. या दिवशी त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी त्यांचे मन अगदी आतुर झालेले असते. त्या सावळ्याच्या दर्शनासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून सर्व भक्तगण पंढरीच्या वारीत सामील होतात...टाळ मृदूंगाच्या गजरात आणि विठूच्या नामात शेकडो मैलांचा प्रवास ते सहजगत्या करतात..अशावेळेस तहान,भूक, वेदना सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असतो. त्यांची पावले पंढरीला लागली कि त्यांचे जीवन कृतार्थ होते..
याच भक्तीची साक्ष देणारे, पंढरपूर इतकेच पवित्र मानले जाणारे एक स्थान पुण्यापासून अवघ्या साठ मैलांवर राजुरी या गावात आहे. 'किर्तने वाडा देवस्थान' मौजे राजुरी (ता. जुन्नर, जिल्हा पुणे) येथे दर वर्षी श्री. पांडुरंगाचा वार्षिक उत्सव आषाढ शुद्ध एकादशी ते आषाढ शुद्ध त्रयोदशी असे तीन दिवस साजरा होतो.
हा उत्सव १७७१-७२ म्हणजे पेशवेकाळापासून श्री. रामाजीपंत कीर्तने या तत्कालीन मामलेदार हुद्द्यावर असलेल्या विठ्ठलभक्ताने सुरु केला. रामाजीपंत कीर्तने हे मूळ रामाजीपंत धनसरे, मूळचे कोकणातले. त्यांना विठ्ठलभक्तीचा ओढा होता. त्यात त्यांचे आई-वडील लवकर निवर्तल्याने त्यांची उदासी वृत्ती होती. दर वर्षी ते पंढरपूरला वारीबरोबर जात. एकदा त्यांनी तळ्यात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवले. ती मुले जहागीरदार खरे यांची होती. त्यांनी त्यांना वाचवल्यामुळे, कृतद्न्यतेपोटी, त्यांनी रामाजीपंतांची थोरल्या बाजीराव पेशव्यांशी ओळख करून दिली. बाजीराव पेशव्यांनी त्यांना जुन्नरला मामलेदारीचा हुद्दा दिला.
रामाजीपंत उत्तम कीर्तन करीत असत आणि त्यामुळे त्यांचे कीर्तनकार म्हणून खूप मोठे नाव झाले. त्यांचे कीर्तन खुद्द पेशवेही ऐकत असत. एक दिवस कीर्तन करीत असताना, त्यांना त्यांचा कीर्तने वाडा पेटला असल्याची जाणीव झाली.. त्यांनी कीर्तन थांबवून विठोबाचा धावा सुरु केला...आग विझल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी कीर्तन पुन्हा सुरु केले. पेशव्यांनी याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांना या बाबत सांगितले. खातरजमा करण्यासाठी पेशव्यांनी एक सांडणीस्वार त्यांच्या गावी पाठवला..तर खरेच तसे घडले होते. त्यानंतर खात्री पटल्यावर पेशव्यांनी, त्यांना 'कीर्तने' हि उपाधी देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
पुढे जेव्हा त्यांचा वृद्धापकाळ सुरु झाला तरी त्यांची वारी सुरूच होती. अशाच एका वारी दरम्यान त्यांना दृष्टांत झाला कि प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिले आहे आणि त्यांना सांगितले कि,"मी तुझ्या घरी येतो'. आता पंढरपूरला पाणी जाण्याची तू दगदग करू नकोस. या दृष्टानंतर रामाजीपंत त्यांच्या गावी परतले आणि आतुरतेने श्री. पांडुरंगाची वाट पाहू लागले. त्यावेळी एक कोणी वैष्णव त्यांच्या घरी आला आणि एका भगव्या वस्त्रात गुंडाळलेल्या तीन मूर्ती त्याने रामाजीपंतांना दिल्या. त्या तांब्याच्या रेखीव मूर्ती राही, श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या होत्या. रामाजीपंतांनी त्या मूर्ती देवघरात ठेवून आलेल्या वैष्णवाचे आगत स्वागत करायला बाहेर आले तोपर्यंत तो वैष्णव दिसेनासा झाला.
रामाजीपंतांनी या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करून सण १७७१-७२ पासून आपल्या वाड्यात दर आषाढी एकादशीला उत्सव सुरु केला तो आजपर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. कीर्तने परिवारातील सदस्य दर वर्षी एकादशी च्या आधी येऊन येथील सर्व व्यवस्था बघतात. तिथे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तिथे महाप्रसादाचा लाभ घेता येतो. राजुरीच नव्हे तर अगदी लांबच्या गावाहून अनेक भक्त इथे येतात.
अजून एक हकीगत अशी सांगितली जाते कि कीर्तने मंडळींना पुण्याहून राजुरील यावे लागे. त्यामुळे तिथल्या मूर्ती पुण्याला घेऊन जाव्यात असा त्यांनी विचार केला. गावकऱ्यांनी थोडा विरोध केला, परंतु कीर्तन्यांच्याच त्या मूर्ती असल्यामुळे ते गप्प झाले. देव बैलगाडीतून नेले जात होते. राजुरी आळेफाटा संपून पिंपळवाडीपर्यंत गाडी आली असता, गाडीची चाके तिथल्या नदीच्या मातीत रुतली..ती काही केल्या निघेना. जवळजवळ २५ बैलगाड्या त्या गाडीला जोडल्या तरी ती बैलगाडी जागच्या जागी. शेवटी असा निष्कर्ष निघाला कि देवाचीच ते स्थान सोडून जाण्याची इच्छा नाही. गाडी परत वळवली आणि बैलांनी ती गाडी अक्षरशः पळवत राजुरीला नेली.
या वाड्यात त्या काळात अखंड नामसमरणाचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरु असतो. कीर्तन प्रवचन होते. कीर्तने कुटुंबीय जेव्हा राजुरीत नसतात तेव्हा त्या देवस्थानाची आणि वाड्याची व्यवस्था अतिशय भक्तिभावाने श्री. राजूरकर यांचे कुटुंबिय बघतात. सध्या कीर्तनेवाडा देवस्थानचे श्री. सुरेश कीर्तने, श्री. अनिल कीर्तने, श्री. आनंद कीर्तने आणि डॉ सौ. वर्ष कीर्तने हे ट्रस्टीज आहेत.
तर राजुरीचा हा विठुराया सर्वांच्या नवसाला पावणारा आहे. खर्या भक्तांच्या सर्व मनोकामना तो पूर्ण करतो. भक्तांची अशी धारणा आहे कि ज्या तरुणांचे विवाह ठरायला विलंब होतो ते इथे दर्शन घेऊन गेले कि काही कालावधीत त्यांचे लग्न जमते.
जय हरी विठ्ठल.
सौ. कांचन आनंद बदामीकर
विघ्नहर लाईट हाऊस राजुरी